हिंगोली :ग्रामीण भागतील महिलेची प्रसुती करायची असेल तर शासकीय रुग्णालयांच्या भरवशावर राहू नका, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण प्रसंगच तसा घडला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एक महिला प्रसुती करण्यासाठी वसमत ग्रामीण महिला रुग्णालयात ऑटोने आली होती. मात्र, रुग्णालयाचा स्टाफ हा कार्यालयीन वेळेत खासगी कार्यक्रमासाठी गेला होता. त्यामुळे त्या महिलेची रुग्णालयासमोरच ऑटो रिक्षात प्रसुती करण्याची वेळ आली आहे. अलका मोरे असे त्या महिलेचे नाव आहे.
काय घडले नेमके? - अलका मोरे या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या होत्या. प्रसूती करण्यासाठी नातेवाईकांनी महिलेला वसमतच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऑटोने आणले होते. परंतु, रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत रुग्णालयातील अधीक्षकांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे महिलेची प्रसुती ही रुग्णालयाच्या दारातच ऑटोमध्ये झाली.
ऑटोमध्येच दिला बाळाला जन्म : रुग्णाचे नातेवाईक संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी डॉक्टरांकडे विनंती करत होते. परंतु, निरोप समारंभाच्या कार्यक्रमात असलेले डॉक्टर आणि कर्मचारी मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे प्रसुती झालेल्या महिलेला बाळासह काही काळ ऑटोमध्येच थांबावे लागले. तर बाळाला लवकर उपचार न मिळाल्याने, बाळाची तपासणी न झाल्याने नवजात बाळाला श्वास घेण्यात त्रास होत होता.