हिंगोली - शिवसेनेने कधीही कुणाला काही कमी केले नाही. मात्र, त्या शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. त्यामुळे या गद्दारांच्या गाड्या मतदारसंघात आल्या की, जो कोणी पहिली गाडी फोडेल त्याचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर सत्कार केला जाईल असे वक्तव्य हिंगोलीचे शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी केले आहे. ( Shiv Sena workers meet in Hingoli ) ते, येथील महावीर भवनमध्ये पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
हिंगोलीचे शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवले - हिंगोली येथे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात आले होते. त्यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यामध्ये कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अजिबात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवले. परंतु, त्यांना धोका दिला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जोरावर आमदार झालेल्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका थोरात यांनी केली.
आता रोखठोक उतर देण्यासाठी रहा सज्ज -ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारखी केली तेच आता तुमच्याकडे येणार आहेत. त्यामुळे त्यांची त्यांना जागा दाखवण्यासाठी तुम्ही रोखठोकपणे उभे राहा आणि पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करा. एवढेच नव्हे तर शिवसेनेत येण्यासाठी जे-जे इच्छुक आहेत त्यांना थोरात यांनी भेट दिली.
या वक्तव्याने कार्यकर्ते गोंधळले -यापूर्वी हिंगोली येथे झालेल्या मेळाव्यामध्ये पूर्वीचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख होण्यासाठी खिसा रिकामा करावा लागेल, असे वक्तव्य केले होते. तर आता नव्याने झालेले जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी गद्दार यांच्या गाड्या फोडण्याचे आवाहन केल्यामुळे कार्यकर्ते आता चांगलेच संभ्रमात पडले आहेत. या दोन्हीही वक्तव्यामुळे एकटे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा होत आहे. नेमकी आता जिल्हाप्रमुख पदासाठी किती खिसा रिकामा करावा लागेल, तर आता कोणते पदाधिकारी व कार्यकर्ते गद्दार यांच्या गाड्या फोडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा -Delhi High Court : 'स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीची गोव्यात नाही रेस्टॉरंट'