हिंगोली -जन्मापासूनच दोन्ही डोळ्यांनी दृष्टहीन असलेल्या युवकाने बँकेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सेनगाव येथील सुदाम वावळे असे या युवकाचे नाव आहे. हक्काची नोकरी मिळाल्याने सुदाम आपल्या आई-वडिलांचा आधार बनला आहे. घरी अठराविश्व दारिद्र्य असताना दृष्टिहीन मुलगा जन्मल्यानंतर सुदामचे आई-वडील चिंतेत पडले होते. केवळ तीन एकर कोरडवाहू शेती आणि जोड व्यवसाय म्हणून दोन शेळ्या अशा हालाकीच्या परिस्थितीत ते कुटुंबाचा गाडा हाकत होते.
अनेक जण सुदामच्या आई-वडिलांना टोमणेही मारत मात्र, त्याच्या आई-वडिलांनी धीर सोडला नाही. हिंगोली येथील अंध विद्यालयात सुदामने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने पुणे येथील नवरोसजी वाडिया महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. 2018 मध्ये बीए केल्यानंतर त्याने नॅशनल स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एक्झाम अकॅडमीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.