हिंगोली - जिल्ह्यातील शिवणी खुर्द येथे गेल्या काही दिवसापासून गावांमधील लोंबकळलेल्या विद्युत तारा ह्या धोकादायक झाल्या आहेत. या विद्युत तारांपासून गावकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. ठिक - ठिकाणी विद्युत पोल देखील निकामी झाले आहेत. काही गावकऱ्यांना 2014 मध्ये कोटेशन भरून देखील अजूही विद्युत जोडणी मिळत नसल्यामुळे येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी गावांमधील साठ फूट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात विद्युत जोडणीसह विविध मागण्यांसाठी 'शोले' स्टाईल आंदोलन - electricity supply
शिवणी खुर्द गावात गावांमधील लोंबकळलेल्या विद्युत तारांच्या दुरुस्तीसाठी आणि 2014 मध्ये कोटेशन भरून देखील अजूही विद्युत जोडणी न मिळाल्याने गावकऱयांनी आपल्या मागण्यांकरिता गावांमधील साठ फूट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले व जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत टाकीवरून खाली उतरणार नसल्याचे गावकऱयांचे म्हणणे आहे.
आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही टाकीवरून खाली उतरणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पोलीस या नागरिकांना खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक खाली उतरण्याचे नावच घेत नव्हते. तेव्हा विद्युत वितरण कंपनीच्या काही अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आंदोलक पाण्याच्या टाकीवर बसून आपली मागणी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत होते. हे आगळेवेगळे आंदोलन पाहण्यासाठी टाकी परिसरात नागरिकांची एकच गर्दी जमली होती. सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलक मागणीवर ठाम होते. सध्या महावितरण कंपनीच्या वतीने या कामांसाठी गावकऱ्यांना तीन दिवसांचा अवधी मागण्यात आला असून आपल्या मागण्या पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेत आंदोलक अजूनपी टाकीवरच बसून आहेत. आंदोलकांनी मागणीसाठी हे पाऊल उचलल्याने जिल्हाभरात चर्चा रंगली आहे.
महावितरण कंपनीच्या वतीने आंदोलनस्थळी आलेल्या अभियंत्यांनी गावातील विद्युत जोडणी व विद्युत दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याचे सांगितले. लवकरच कामे पूर्ण होतील असे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात कराल तेव्हाच आम्ही टाकीच्या खाली उतरू असे आंदोलक अभियंत्यांना सांगत होते. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात नेहमीच आगळेवेगळे आंदोलन करून प्रशासनाला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो.