हिंगोली- कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळाही बंद आहेत. या शाळा 15 जूनला सुरु करण्याचा मानस आहे. मात्र, पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच खासगी शाळेने फी वाढवू नये आणि पालकांना फीसाठी तगादा लावू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 91 वर पोहोचली आहे. तर 3 रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 88 कोरोनाबाधित रुग्णावर हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला आहे. मोठ-मोठे उद्योग बंद पडले आहेत. मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा विदारक परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक शाळेची फी भरू शकत नाहीत, त्यामुळे खासगी शाळा चालकांनी पालकांना फीसाठी तगादा लावू नये. शिवाय टप्या-टप्यात फी घ्यावी. जे शाळा चालक विद्यार्थ्यांच्या फी साठी पालकांकडे तगादा लावतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गायकवाड यांनी सांगितले.