हिंगोली - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे हिंगोली आरोग्य प्रशासनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, कोरोना बाधित रुग्णांसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या डॉक्टरांनी वापरलेल्या पीपीई कीट जिल्हासामान्य रुग्णलायातील कोरोना वार्ड परिसरात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे जबाबदार डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
आधीच कोरोनामुळे प्रत्येकजण हैराण आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्या घरची आणि त्या गावातली परिस्थिती काय असेल याचे चित्रण रेखाटणे कठीण आहे. मात्र, रुग्णांवर डॉक्टर जीवाची पर्वा न करता उपचार करत आहेत. परंतु उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या कीट या कोरोना वार्ड परिसरात खुलेआम फेकून देत असल्यामुळे डॉक्टरांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान, यापूर्वीच आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्डला भेट दिली असता परिसरात वापरण्यात आलेले हॅन्ड ग्लोज, मास्क, कॅप इतरत्र आढळून आल्याची बाब पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिली होती. यानंतर त्यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांना सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा -VIDEO : धनबादमध्ये भाजप नेत्याची भरदिवसा हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
आयुक्त केंद्रेकर यांनी दिलेल्या सूचनांचे कितपत पालन केले जाते, हा प्रश्न सदर प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे आता संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी केली आहे. त्यामुळे आता शल्यचिकित्सक किशोर श्रीवास हे कोणावर कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
हेही वाचा -'न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच, पण भारतीय संविधानाच्या अधिकारांचा नव्यानं विचार होणं गरजेचं'