हिंगोली: येथील रामलीला मैदानावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, या सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांवर पैशांची उधळण झाल्याच्या व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या सभेमध्ये जिल्ह्यातील विविध भागातून कार्यकर्ते व नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
50 हजार कोटी रूपयांची कामे: हिंगोलीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली. यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, देशात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरल्याने आता प्रवास करणे सोयीचे झाले आहे. गेल्या आठ वर्षात 50 हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामे करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत एका कंत्राटदाराला घरापर्यंत येऊ देण्याची वेळ आणली नाही, परंतु रस्ता खराब केला तर त्याला अजिबात सोडले नाही, हा जनतेचा पैसा आहे आणि त्यातुन रस्ता चांगला झाला पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
हळद क्लस्टरसाठी 100 एकर जागा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हळद संशोधन केंद्राच्या बाबतीत म्हणाले की, रस्त्यालगत सरकारी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी लाॅजेस्टीक पार्क उभारला जाईल तसेच 100 एकर जागेवर हळद क्लस्टरसाठी देतो. या ठिकाणी हळदीचे लोणचे, तेल, क्रीम, औषधी तयार करण्याचे उद्योग सुरु करण्याचे त्यांनी सुचवले. त्यातून हिंगोली जिल्हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर पोहोचवा, अशी अपेक्षाही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली.