हिंगोली- जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विलगीकरण वॉर्डमध्ये २ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. एका रुग्णास काल दाखल करण्यात आले असून आज दुसऱ्या रुग्णास दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही रुग्ण पुरुष असून, ते कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून एका पाठोपाठ कोरोना संशयित रुग्ण वाढल्याने हिंगोलीकरांची आता चांगलीच चिंता वाढली आहे. प्रशासन हात जोडून नागरिकांना रस्त्यावर न निघण्याचे आवाहन करत आहे.
संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे नागरिकांची झोपच उडाली आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. संचारबंदी लागू असताना रस्त्यावर कोणाला न फिरू देण्यासंदर्भात पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. तर हिंगोली, वसमत नगरपालिका आणि कळमनुरी, सेनगाव, ओंढा-नागनाथ नगर पंचायतीच्यावतीने शहरात स्वच्छता ठेवण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहे.