हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे हिंगोलीकर चांगलेच आनंदून गेले होते. रुग्णांची संख्याही शंभराहून केवळ दहावर पोहोचली होती. मात्र, मुंबईवरून येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर कोरोनाबाधितांची आकडेवारी देखील वाढतच गेली. आजघडीला जिल्ह्यात 182 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. तर, आतापर्यंत 105 जण बरे झाले असून त्यांना आरोग्य विभागाने डिस्चार्ज देखील दिला आहे. आज(सोमवारी) वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात नव्याने दोन रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या 182 वर - hingoli new corona cases news
जिल्ह्यात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 182 झाली आहे. त्यापैकी 105 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात 77 कोरोनाबाधित रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
![जिल्ह्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या 182 वर जिल्ह्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:40-mh-hin-02-corona-update-7203736-01062020192302-0106f-1591019582-927.jpg)
हिंगोली जिल्ह्यात मुंबईवरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती, त्यानुसार जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. आज पुन्हा नव्याने रुग्ण आढळून आले असल्यामुळे पुन्हा एकदा हिंगोलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार वसमत येथील 17 वर्षीय मुलाला तर औंढा नागनाथ येथील एका बारा वर्षे बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज 77 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी येथे 8 सेनगाव येथे 12 हिंगोलीत 31 वसमत येथे 12 अशाप्रकारे रुग्ण उपचार घेत आहेत. यातील सर्व रुग्णांची प्रकृती ही स्थिर असून त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे दिसून येत नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये सध्या 14 रुग्ण दाखल आहेत.
जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला पुन्हा दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण पसरले आहे. वास्तविक पाहता सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामीण भागात खरिपाची तयारी करण्यासाठी शेतकरी मग्न झाले आहेत. मात्र, ज्या भागांमध्ये हे रुग्ण आढळून आले तो भाग प्रशासनाच्यावतीने परिसर बंद केला जातोय. त्यामुळे या भागात खरिपाच्या पेरणीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.