हिंगोली- जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोजकेच तरुण काहीतरी करण्याच्या उद्देशाने धडपड करतात. त्यापैकीच हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे दोन सुशिक्षित बेरोजगारांनी बेरोजगारीचा बाऊ न करता जुन्या भंगार गाडीची दुरुस्ती करून त्यावर रसवंती उभारली. या रसवंतीद्वारे अनेकांची तृष्णा भागवत दिवसाकाठी ४ ते ५ हजार रुपये उत्पन्न मिळवित आहेत. यातून दोघांचे समाधान तर होतेच सोबतच रस पिणाऱ्यांचेही समाधान होत असल्याने या रसवंतीवर दिवसभर ग्राहकांची गर्दी होते.
मित्राच्या कल्पनेतून उभारलेली फिरती रसवंती ठरतेय सर्वांचे आकर्षण मुंगीदर भुसावळे व यादव मुळे अशी या दोन सुशिक्षित बेरोजगार युवकांची नावे आहेत. हे दोघेही लोण या गावातील असून दोघांचेही पदव्युत्तरचे शिक्षण झाले आहे. एवढे शिकूनही नोकरी लागली नसल्याने भुसावळे यांनी किराणा दुकान थाटले. तर मुळे याने एक वाहन घेऊन लोण ते वसमत मार्गे गाडी चालवित होता. मात्र, या दोघांची मैत्री एवढी घट्ट होती, की ते रोज एकमेकांना भेटल्याशिवाय अजिबात राहत नसत.
या दोघांची सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती. नेहमीच ते दोघे मिळून व्यवसाय करण्याचा विचार करीत होते. दिवसेंदिवस गावात दुकानांची तर वाहनांची स्पर्धा झाल्याने दोघांचाही धंदा मार खायचा. त्यामुळे यांच्या वाहतूक फेऱ्या कमी कमी होत जाऊन व्यवसायच कमी करून टाकला. तर किराणा दुकानही पाहिजे तसे चालत नव्हते. परंतू, सुरुवातीपासून उभा केलेला व्यवसाय बंद काय करायचा नाही म्हणून दुकान सुरूच ठेवले. मात्र, दुकानातून मिळालेल्या उत्पन्नात जेमतेम परिस्थिती भगत होती. तर मुळे हा गाडी सोडून अधूनमधून शेतीकडे लक्ष देऊ लागला. दरम्यान, दोघांची रोज भेटी-गाठी असल्याने यातून दोघांनी रसवंतीचा आगळावेगळा फिरता व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्यांनी यासाठी जुनी भंगारातील गाडी खरेदी केली. तिची दुरुस्ती करून एका वर्कशॉप वाल्याला रसवंती सुरू करण्यासंदर्भात कल्पना सांगितली. तशी वर्कशॉपच्या कारागिरांनीदेखील होकार दर्शविताच या दोघांच्या प्रवासास सुरुवात झाली. उत्कृष्ट गाडी बनवत त्यावर रसवंती उभारण्यात आली. सुरुवातीला वसमत येथे ते फिरून रसवंतीचा व्यवसाय करत होते. रसवंतीच पण हटके असल्याने सुरुवातीपासूनच याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळून आला. विशेष म्हणजे या रसवंतीवर पाच रुपयात ग्लास भरून रस मिळत असल्याने ग्राहकांची रस पिण्यासाठी एकच झुंबड उडत आहे.
आज घडीला या सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या रसवंतीला एवढा भरभरून प्रतिसाद मिळतोय की दिवसाकाठी ४ ते ५ हजार ग्लास रस सहजरित्या कटतात. या रसवंतीवर रस पिण्यासाठी आलेला ग्राहक एकपेक्षा अधिकच ग्लास रस पितो. त्यामुळे दिवसाकाठी ४ ते ५ हजार रूपाचे उत्पन हमखास मिळत असल्याचे हे युवक सांगतात. जवळपास एक ते दीड लाख महिना मिळत असल्याने कोणतीही नोकरी करण्याची अजिबात गरज नाही. मनात जर जिद्द असेल तर आपण नक्कीच आकाशाला गवसणी घालू शकतो. केवळ शिक्षणाचा बागुलबुवा करत न बसण्यापेक्षा काही तरी वेगळे करण्याची जिद्द असावी. तसेच ते सत्यात उतरविण्याचे प्रयत्न असावेत. तर हमखास यश मिळत असल्याचे दोघेही युवक सांगतात.