हिंगोली - मुंबई येथील चिंचपाडा ते औंढा नागनाथ या मार्गे खासगी वाहनातून दोन पॉझिटिव्ह रुग्णांनी 13 जणांसोबत प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघे पॉझिटिव्ह रुग्ण बाप लेक असून, हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तपासणी केलेल्या मुंबई येथील रुग्णालयाला प्राप्त झाला. ही माहिती मुंबईतील चिंचपाडा येथील आशा वर्कर सुकेशनी धुळेने औंढा नागनाथ तालुक्यातील नातेवाईकांना कळविल्याने पुढील अनर्थ टळला. त्या सर्वांना ताब्यात घेत औंढा नागनाथ येथील भक्त निवास मध्ये ठेवण्यात आल्याची माहिती औंढा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन खूपच सतर्क झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक जण मुंबई येथे चिंचपाडा येथे कामानिमित्त गेले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी काहीही काम नसल्याने कामानिमित्त गेलेल्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात तपासणी केली आणि सर्वजण एका खासगी वाहनाने औंढा नागनाथकडे रवाना झाले. जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांनी केला.