हिंगोली- जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रविवारी हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर एका व्यक्तीचा सारीच्या आजाराने मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 558 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्याने 366 जण बरे झाले आहेत. सध्या 186 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी वसमत येथील एक आणि सेनगाव येथील एक असे दोन रुग्ण आहेत. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड मध्ये उपचार घेत असलेल्या तोफखाना भागातील एका 80 वर्षीय व्यक्तीचा सारीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. आठ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना प्रशासनाच्या वतीने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. विविध भागातील रुग्ण तसेच कोरोना संशयिताचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली 16 पथके स्थापन केली आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांना रविवारी हिंगोली येथील नगरपालिकेच्या कल्याण मंडपम सभागृहात प्रशिक्षण दिले आहे. आता ही पथके कोरोनाबाधित व संभाव्य कोरोना रुग्णांचा शोध घेणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात निश्चितच कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीला जिल्हा अंतर्गत असलेल्या आयसोलेशन वार्ड व सर्व कोरोना केअर सेंटर मध्ये 589 व्यक्ती दाखल आहेत. त्यापैकी 233 जणांचे अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांची प्रकृती ही गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.