हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात ढेपाळत चालला आहे. या ठिकाणी वरिष्ठांचे अजिबात लक्ष नसल्याने मोठे अधिकारी- कर्मचारी, डॉक्टर वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. एवढेच नव्हे तर पगाराचे बिल काढण्यासाठी लिपिक पैसे मागत असल्याने एका कक्ष सेवकाने गोळ्यांचे अति सेवन केले. त्याच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे या रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कक्ष सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न - हिंगोली
अनिल भगत असे कक्ष सेवकाचे नाव आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे. विशेष म्हणजे येथील लिपिक लोकेश शिंदे व अजय चिलकेवार हे पगार काढण्यासाठी पैसे मागतात, तसेच डॉक्टरही वारंवार त्रास देतात.
अनिल भगत असे कक्ष सेवकाचे नाव आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे. विशेष म्हणजे येथील लिपिक लोकेश शिंदे व अजय चिलकेवार हे पगार काढण्यासाठी पैसे मागतात, तसेच डॉक्टरही वारंवार त्रास देतात. भगत यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली आहे. भगत या शस्त्रक्रियेचे बिल बनवण्यासाठी शिंदे यांच्याकडे गेले होते. मात्र, तुझे ऑपरेशनच झाले नाही, उगाच नाटक करतोस, असे म्हणून त्यांना त्रास दिला गेला, अशी माहिती भगत यांनी दिली. शल्यचिकित्सक आमचे काहीही ऐकून घेत नाहीत. ते म्हणतात की वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही. विषेश म्हणजे रुग्णालयात होत असलेल्या त्रासासबंधी वर्ग चारच्या सर्व कर्मचाऱ्यांनी १८ मुद्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, त्यावर देखील काहीच कार्यवाही झालेली नाही.
डॉक्टर ही त्रास देतात. सर्वच कामे आम्हाला करायला लावतात अशा त्रासाचा भगत यांनी पाढाच वाचला. हा त्रास केवळ एका कर्मचाऱ्याला नसून वर्ग चारच्या सर्वच कर्मचाऱ्यांना असल्याची चर्चा रुग्णालयात जोरात सुरू आहे. शल्यचिकित्सक यांनी भगत यांची भेट घेतली असून चौकशी करून कारवाई करणार असल्याचे शल्यचिकित्सक किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. आता शल्यचिकित्सक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.