हिंगोली- खंडाळा परिसरात वाघाने 4 गाईवर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. वनविभागाने वाघाचे लोकेशन तपासले असता खंडाळा परिसरात वाघ असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
खंडाळा येथे ३ गाईंवर, तर कलगाव येथे एका गाईवर वाघाने हल्ला केला. खंडाळा येथील राम किसन गायकवाड आणि शिवाजी गायकवाड या शेतकऱ्यांना वाघाचे समोरासमोर दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत पळ काढला. दरम्यान, तुरीच्या ओळीत बसलेला वाघ तेथून उठला आणि समोर जाऊन एका गाईवर हल्ला केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाला वाघ आल्याची माहिती कळताच विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी त्यांच्या पथकासह स्वतः खंडाळा आणि कलगाव शिवारात धाव घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. तसेच गाईंची योग्य ती नुकसान भरपाई देणार असल्याचे केशव वाबळे यांनी सांगितले.