हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील मसोड फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. संजय मारोती काजळे (२८) आणि शिवम संजय काजळे (५, दोघेही रा. सलेगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या घटनेत बसने दिलेल्या धडकेत आकाश शिवाजी खंडेक (२७, रा. येडसी) नावाचा दुचाकीस्वार ठार झाला आहे.
हिंगोलीत वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू; बसच्या धडकेत १ तर ट्रकच्या धडकेत २ ठार - काका
हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकची आणि हिंगोलीकडे येणाऱ्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. तर दुसऱ्या घटनेत पुसद आगाराच्या बसने दुचाकीला धडक दिली. या दोन्ही वेगवेगळ्या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकची (ए.पी. ०७, टी एच. ७४२९) आणि हिंगोलीकडे येणाऱ्या दुचाकीची (जी. जे. ९५, डी. आर. १९४०) समोरा-समोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती, की दुचाकीवरील काका-पुतण्या रस्त्यावर जोराने आदळले. दोघेही रक्तभांबळ झाल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. प्रवाशांच्या मदतीने दोघांना कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषित केले. घटनास्थळी कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केला आहे. अजून या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तर दुसऱ्या घटनेत हिंगोली तालुक्यातील सिरसम. बु येथून काही अंतरावर पुसद आगाराची बस पुसदवरून हिंगोलीकडे येत असताना बसने दुचाकीला धडक दिली. यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची रिप-रिप सुरू आहे. मागील २ दिवसांपूर्वी देखील याच रस्त्यावर आखाडा बाळापूर येथे अपघात झाला होता. या रस्त्यावर अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.