हिंगोली- मागील अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हा धुमाकूळ कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत चक्क चोरट्यांनी पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमाल कक्षातील दारूवरच डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलिसांची चोरट्यांच्या मनात किती भीती आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
पोलीस प्रशासनाची नाचक्की होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासन कमालीची गोपनीयता देखील पाळत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने हे बिंग फुटले आहे.
हेही वाचा - सायकल रॅलीद्वारे हिंगोलीत मतदान जनजागृती
हिंगोली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात जप्त केलेला देशी विदेशीचा दारूसाठा मुद्देमाल कक्षात ठेवला होता. मात्र, चोरट्यांनी चक्क मुद्देमाल कक्षाच्या खोलीच्या खिडक्यांचे गज कापून 60 हजार रुपये किमतीचे 26 देशी दारूचे बॉक्स तर 14 हजार रुपये किमतीच्या 180 एमएलच्या 64 बाटल्या चोरून नेल्या आहेत. या प्रकाराने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर ऐन निवडणुकीच्या काळात हिंगोलीचे पोलीस प्रशासन किती सज्ज आहे? हे या गोष्टीवरून समोर आले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांची उडाली धांदल
एवढेच नव्हे तर या घटनेची कोणाला माहिती होवू नये, म्हणून शहर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैंजने यांनी या घटनेतील काहीच माहिती नसल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे अशी कोणती घटनाच घडली नसल्याचे पोलीस प्रशासन दर्शवत आहे. मात्र, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबंड यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी पोलीस जमादार सखाराम मोहनराव थेटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.