महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सवाला का आहे महत्त्व? - औंढा नागनाथ मंदिर महाशिवरात्री उत्सव

देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील औंढा नागनाथ याठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

Aundha Nagnath Temple story
औंढा नागनाथ मंदिर गोष्ट

By

Published : Mar 11, 2021, 7:32 AM IST

हिंगोली -संपूर्ण जगभरात असलेल्या महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या महोत्सवावर अक्षरशः पाणी फिरले आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यामुळे हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हेमाडपंथीय औंढा नागनाथ येथील मंदिरात या महोत्सवाची परंपरा जोपासली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे नागनाथाची केवळ पूजा आणि महाआरती झाली.

औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सवाला महत्त्व आहे
बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील मंदिराची सर्वदूर ओळख आहे. नागनाथाच्या दर्शनासाठी परराज्यातून भाविक आवर्जून हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर याठिकाणी करण्यात आलेले कोरीवकाम पाहण्यासाठी पर्यटक आणि इतिहासप्रेमी देखील मोठ्या प्रमाणात येतात. हे मंदिर हेमाडपंथीशैलीतील असून द्वापार युगात त्याची स्थापना झालेली आहे. साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे आहे हे मंदिर -

साडेपाच हजार वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. द्वापार युगामध्ये पांडवांना जेव्हा वनवास झाला होता त्या वनवास काळामध्येच या पांडवकालीन ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह पार पडलेला आहे. त्यामुळे या महाशिवरात्रीच्या उत्सवाला फार महत्त्व आहे. महाशिवरात्री बरोबरच नागपंचमीच्या दिवशीही या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. गेल्यावर्षीपासून कोरोना महामारीचे संकट असल्याने या सणांवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनामुळे मंदिर यंदाही बंद -

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाची दुसऱ्यांदा लाट आल्याने प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. त्यामुळेच यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसरात भाविकांना येण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. मंदिर बंद असले तरी रात्री बारा वाजता कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर व संस्थांचे अध्यक्ष यांच्या हस्ते नियमीत महापूजा पार पडली आहे.

रथाच्या घातल्या जातात पाच प्रदक्षिणा -

महाशिवरात्री यात्रा महोत्सवातमध्ये मुख्य आकर्षण असते ते औंढा नागनाथ मंदिरात रथोत्सवाचे. एकादशीपासून सुरू होणाऱ्या या यात्रेचा शेवट रथोत्सवाने होतो. मंदिराच्याभोवती या रथाच्या पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. हा उत्सव पाहण्यासाठी येथे भाविक आवर्जून हजेरी लावतात.

हेही वाचा -महाशिवरात्री उत्सवासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहिर

ABOUT THE AUTHOR

...view details