हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देश बंद ठेवण्यात आला होता. आता सरकार हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणत आहे. मात्र, विवाह समारंभात 50 पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंडप व्यावसायिक, फोटोग्राफर, कॅटरर्स, डेकोरेटर्स यासह इतरही संबंधित व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. हिंगोली जिल्हा टेन्ट अँड डेकोरेटर असोसिएशन आणि विवाह सेवा संघर्ष समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विवाह समारंभामध्ये 500 लोकांना परवानगी देण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे.
हिंगोलीत मंडप व डेकोरेटर्सचे धरणे आंदोलन हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी -
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा डेकोरेटर असोसिएशन व विवाह सेवा संघर्ष समितीने आंदोलन केले. या धरणे आंदोलनांमध्ये हजारो व्यावसायिक सहभागी झाले.
बँड आणि इतर साहित्यासह आंदोलन
कोरोनामुळे विवाहसमारंभ अतिशय कमी लोकांमध्ये पार पडले. परिणामी या समारंभांमध्ये लागणारे साहित्य धूळ खात पडले आहे. त्यामुळे आजच्या धरणे आंदोलनामध्ये व्यावसायिकांनी हे सर्व साहित्य मांडत सरकारकडे अनुदान नव्हे तर, काम द्या, अशी मागणी केली.
मजुरांवर उपासमारीची वेळ
विवाह समारंभांमध्ये अतिमहत्वाचा भाग असलेल्या भोजन व्यवस्थेचे काम कॅटरर्सना दिले जाते. यातून भाजीपाला विक्रेत्यांसह अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र, आता विवाह सोहळ्यांमध्ये केवळ पन्नास लोकांनाच परवानगी असल्याने विवाह समारंभासाठी घरीच जेवण तयार केले जाते. कोरोनामुळे सर्व काही बंद असल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
फोटोग्राफर आणि घोडा व्यावसायिकही अडचणीत
विवाह समारंभामध्ये घोडा आणि फोटोग्राफर हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, विवाह सोहळे मोठे होतच नसल्याने या व्यावसायिकांनाही रोजगार मिळेनासा झाला आहे. साधारण मार्च महिन्यापासून लग्नसराई सुरू होते. त्यामुळे अनेक फोटोग्राफरर्सनी त्या अगोदरच बँकांचे व खासगी कर्ज काढून महागडे कॅमेरे देखील विकत घेतले होते.
भाडे देण्याचे झाले वांदे
विवाह समारंभासाठी विविध प्रकारचे साहित्य लागते. काही व्यावसायिक हे साहित्य भाड्याच्या जागेमध्ये ठेवतात. यावर्षी व्यवसायच न झाल्याने मंडप डेकोरेशन व्यावसायिकांना भाडे देणेही अशक्य झाले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून एकाच जागी ठेवलेल्या साहित्यावरही धूळ चढल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली.
फुल विक्रेतेही अडचणीत
विवाह समारंभामध्ये फुलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या अतिशय साधेपणाने आणि थोडक्यात विवाहसमारंभ आटोपले जात आहेत. त्यामुळे फुलांची विक्री करणारे व्यावसायिक आणि उत्पादन घेणारे शेतकरीही अडचणीत सापडले आहेत.