महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाव विक्री प्रकरण : शेतकऱ्यांची मनधरणी करण्यात आमदार, जिल्हाधिकाऱ्यांना अपयश

दुष्काळ, नापिकी व विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी स्वतःचे गावच विक्रीसाठी काढले. या घटनेला सहा दिवस झाल्यानंतर बुधवारी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांशी भेट घेताना आमदार आणि जिल्हाधिकारी

By

Published : Jul 25, 2019, 9:58 AM IST

Updated : Jul 25, 2019, 12:24 PM IST

हिंगोली- दुष्काळ, नापिकी व विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी स्वतःचे गावच विक्रीसाठी काढले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या गावाची चर्चा सुरू झाली. गाव विक्रीस काढून सहा दिवस उलटल्यानंतर बुधवारी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचे समोर आले आहे.

ताकतोडा येथील शेतकरी परिस्थितीसमोर हतबल झाले आहेत. त्यातच निसर्गही शेतकऱ्यावर कोपल्याने शेतीतील उत्पन्नात मोठी घट झाली आहे. येथील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. मात्र, मोजक्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला. त्यातच शासनाने सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेचाही शेतकऱ्यांना लाभ न झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यातच, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज न देण्याची आढमुठी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी नाइलाजाने फायनांन्समधून कर्ज उचलून पेरणी व घरे-दारे बांधली. मात्र, आता कर्ज फेडणे इतपतही शेतकऱ्यांकडे उत्पन्न होत नसल्याने शेतकरी हा परिस्थिती समोर पूर्णपणे नडला आहे.

शेतकऱ्यांची मनधरणी करताना आमदार आणि शेतकरी

त्यामुळेच मागील चार ते पाच दिवसांपासून शेतकऱ्यांनी चक्क आपले गावच विक्रीस काढून आंदोलन उपोषण सुरू केले. तर आज शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता कुठे अधिकाऱ्यांसह लोक पुढाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत भेटीगाठी घेण्यासाठी रीघ लागली आहे. आज जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व आमदार तानाजी मुटकुळे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नसून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. यावेळी समस्येने त्रस्त एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर शर्ट देखील फाडला.

ताकतोडा पाठोपाठ 'हे' गाव सुद्धा विक्रीच्या मार्गावर

ताकतोडा गावापासून जवळच असलेल्या हाताळा गावातही हीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने, इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपले गाव विक्रीसाठी काढायला तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दोन गावे विक्रीस निघाली आहेत. या परिस्थिती नंतर प्रशासन या दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या रास्त मागणीकडे कसे लक्ष देते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Jul 25, 2019, 12:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details