हिंगोली- संपूर्ण देशात कोरोनामुळे हाताला काम नसल्याने मोठ्या संख्येने लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तर, काही भागात पाणी टंचाई असल्यामुळे लोकांना अन्नासह पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन पाणी उपलब्ध करून देत नसल्याने, अन ग्रामपंचायतीने साफ झुगारून लावल्याने, पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांनी स्वतःच पाचशे-पाचशे रुपये जमा करून श्रमदानातून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला अन् खोदकामही सुरू केले आहे. आता आम्ही आमचेच हक्काचे पाणी पिणार असल्याचे ताकतोडा येतील ग्रामस्थ सांगत आहेत. ग्रामस्थांच्या या पुढाकाराने मात्र ग्रामपंचायतीचे मोठे बिंग फुटले आहे.
ग्रामस्थांचा पाण्यासाठी संघर्ष; ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्वतःच विहीर खोदण्यास केली सुरुवात एकेकाकाळी कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी हेच गाव चक्क विक्रीसाठी काढून संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच गावात आता भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. ही टंचाई निवरण्यासाठी मात्र कोणी पुढे आलेले नाही. उन्हाळा संपत आलाय तरी ही ग्रामस्थांना पाणीच नसल्याने, उन्हातान्हात रानोमळात भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांची ही भटकंती कमी व्हावी म्हणून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून येथे विहीर मंजूर केली. परंतु उन्हाळा संपत आलेला असला तरी ही विहिरीचे कामच सुरू करण्यात आलेले नाही. अनेकदा, पंचायत समिती, ग्रामपंचायतचे उंबरठे झिजवून झिजवून ग्रामस्थ हैराण झाले. शेवटी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओकडे देखील तक्रार दाखल केली. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी सरपंचाला शेवटची विचारणा केली, मात्र सरपंचानेदेखील काही प्रतिसाद दिला नसल्याने, स्वतः ग्रामस्थानी कंबर कसली अन् 60 फूट खोल विहीर खोदण्यास सुरुवात केली. एवढे होऊन देखील प्रशासनाचा कोणता अधिकारी या गावात पोहोचलेला नाही. मात्र जेव्हा गावात विविध माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचले तेव्हा कुठे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विहिरीवर धाव घेतली. मात्र ग्रामस्थ कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे लक्ष न देता आपले आपले काम करत आहेत. ग्रामस्थांचा प्रशासनावरचा राग अनावर झाला आहे. जोपर्यंत विहिरीचे खोदकाम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्हाला कोणी अडथळा करू नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
आम्ही अनेकदा शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या. मात्र नेहमीच रिकाम्या हाताने परतावे लागले. आता तरी आम्हाला आमचे ध्येय पूर्ण करू द्या, अशी विनंती विहिर पाहण्यासाठी येणाऱ्यांना हे ग्रामस्थ करीत आहेत. तर दुसरीकडे सेनगावचे गटविकास अधिकारी ताकतोडा येथील पाणी टंचाई निवडण्यासाठी येत्या आठ दिवसात उपाययोजना करणार असल्याचे सांगत आहेत.
आमची समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता शंभर टक्के श्रमदानातून विहीर खोदुनच आम्ही आमच्या समस्येवर मात करणार, असे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र ऐन पाणी टंचाईत ग्रामस्थांचा हा पुढाकार खरोखरच पुढाऱ्यांसाठी भविष्यात चपराकच राहणार आहे.
एकेकाळी लागायची या गावात पुढाऱ्यांची रांग-
गाव विक्रीस काढल्यानंतर ग्रामस्थ हे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपोषणासाठी बसले होते. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढारी या गावांमध्ये धाव घेत असत. मात्र, आज घडीला श्रमदान करण्यासाठी निघालेल्या ग्रामस्थांकडे साधे वळून देखील पाहायला कोणता पुढारी अजिबात तयार नसल्याची खंत या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.