हिंगोली - मित्राने वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातुन एका मित्राने दुसऱ्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. माधव पांडुरंग पोले असे (वय - 22) असे मृत युवकाचे नाव आहे. तर दिनेस उर्फ दगडू मोळके असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधव पोले आणि दिनेश उर्फ दगडू मोळके हे जिवलग मित्र होते. दिनेशचे वडील आणि माधवच्या वडीलांमध्ये दोन दिवसांपूर्वी जोराचे भांडण झाले होते. दरम्यान, माधव ने भानुदास मोळके यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग हा दिनेशच्या मनात होता. तो माधव याला एकांतात भेटण्याची प्रतीक्षा करीत होता. मात्र, माधव हा घरातून बाहेर निघण्याचे टाळत होता. शेवटी दिनेश हा माधवच्या घरी गेला. त्याला बाहेर बोलावुन घेतले. त्याच्या सोबत वाद घालू लागला. तोच घराजवळ असलेले तिघेजण हे धावून आले. त्यांनी माधवला पकडले आणि दिनेशने चाकूने छातीवर वार केला. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने माधवचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.