हिंगोली- जिल्ह्यातील नरसी येथील एका निलंबित रेशन दुकानदाराला पुरवठा विभागाने रेशनचा माल पुरवठा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुकानदाराने आपल्या दुकानासमोर दुकानाचा राजीनामा दिला असल्याची नोंद फलकही लावले आहे. तरीही या दुकानामध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असल्याने गावातील नागरिकांनी याची तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र, तहसीलदारांनी या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.
याच दुकानदाराच्या मनमानीला कंटाळून एका लाभार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रशासनाने लाभार्थ्याची दखल घेत दुकानदाराच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे एक महिन्याच्या कालावधीनंतर हिंगोली तहसीलदार गजानन शिंदे यांनी निलंबित केलेल्या दुकानदाराला पुन्हा धान्य पुरवठा का केला? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.