हिंगोली- जिल्ह्यात ३ ते ४ दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली होती. ४२ अंशावर तापमान पोहोचल्याने उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र, गुरूवारी अचानक हिंगोली जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने एकच धांदल उडाली. अचानक हजेरी लावलेल्या पावसाने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच विविध गावात प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारांची देखील एकच धांदल उडाली.
हिंगोली जिल्ह्यात ३-४ दिवसापासून तापमानाचा पारा वाढला होता. दरम्यान, गुरूवारी अचानक अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची एकच घाई उडाली. काही भागात झालेल्या गारपिटीमुळे आंबा, हळद, गहू, आदी उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एवढेच नव्हे तर सध्या हळद शिजवण्याचा मोसम सुरू असून तापत्या उन्हात शेतकऱ्यांनी हळद टाकली होती. अचानक आलेल्या पावसामुळे हळद झाकून टाकण्यासाठी शेतकरी एकच धावपळ करीत होते. तर कडोळी येथे रमतेराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त टाकलेला मंडप सुसाट वार्यामुळे उडून गेला.