हिंगोली - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. पुन्हा एका कर्जबाजारी युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथे घडली. या युवा शेतकऱ्याची पुतणी विवाहयोग्य झाली होती. मात्र जवळ दमडीही नसल्याने विवाह कसा करावा, याची चिंता या शेतकऱ्याला पडली होती. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतात नापिकी
सोमनाथ रामकीसन डव्हळे (२६) असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. सोमनाथ हे गेल्या काही दिवसापासून बँकेमध्ये कर्जासाठी खेटे घेत होते. मात्र त्यांना बँकेतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. तर यंदा पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यातच कोरोना या सर्व परिस्थितीने सोमनाथ हे गोंधळून गेले होते. एरवी क्विंटल आणि होणारे उत्पन्न पावसाच्या लहरीपणामुळे किलोवर येऊन ठेपले. शेतात नापिकी झाली. दिवसेंदिवस पैशाची उणीव भासू लागली. अशातच पुतणी विवाहयोग्य झाली. मात्र जवळ पैसे नसल्याने तिचा विवाह नेमका कसा करायचा, पैसे कुठून जमवायचे, या चिंतेने ते काही दिवसांपासून व्याकुळ झाले होते.
पडक्या घरात घेतला गळफास
नेहमीप्रमाणे शेतात जाऊन वेळेवर घरी पोहोचणारे सोमनाथ हे बराच वेळ होऊन घरी पोहोचले नाही. त्यांना घरच्यांनी खूप संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होत नव्हता. शेवटी शेतात जाऊन पाहतात, तर सोमनाथ हे पडक्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.