हिंगोली - महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरीसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणच्या स्ट्रॉबेरीला सर्वाधिक जास्त आहे. तीन वर्षांपूर्वी किल्ले भ्रमंतीसाठी या भागात गेलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सवना येथील युवा शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्या पिकाची माहिती घेत, हा प्रयोग आपल्या शेतात करण्याचा मनोमन निर्धार केला. मात्र, दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे रोपच मिळत नव्हते. अखेर यंदा रोप मिळाले अन् त्याची अवघ्या दीड गुंठ्यांत लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाला असून आतापर्यंत खर्च वगळता 65 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे हा युवा शेतकरी सांगतोय.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे हिंगोलीत उत्पादन नितीन प्रकाश नायक असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. नितीनकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. या शेतीबरोबरच नितीनने आपल्या शेताला लागून असलेली जमीन मक्त्याने करून त्या शेतीमध्येही तो नवनवीन पीक प्रयोग करत असतो. नितीनचे ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेले आहे. शिक्षण सुरू असतानाच नितीन मार्केटिंगची खासगी नोकरी करीत होता. नोकरी करीत असताना तीन वर्षांपूर्वी तो मित्रासमवेत महाबळेश्वर येथे किल्लेभ्रमंतीसाठी गेला होता. किल्लेभ्रमंती करीत असताना, त्या भागात स्ट्रॉबेरीची शेती पाहून त्याने स्ट्रॉबेरीच्या शेतीला भेट देऊन, पीक पाहणी केली. तेथील शेतकऱ्यांकडून पीक लावडीची माहिती घेतली. गावी परत आल्यानंतर आपल्या शेतात स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी आपल्या वडिलांकडे प्रस्ताव मांडला. मात्र, आपल्याकडील हवामान या पिकासाठी योग्य नसल्याचे कारण सांगून, वडिलांनी त्याला नकार दिला. मात्र काही करून हा नवा प्रयोग करण्याची नितीनची इच्छा होती. त्याने स्ट्रॉबेरीचे रोप मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. मात्र, रोपदेखील मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. हेही वाचा -अनोखा प्रयोग : सोलापुरातील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती; भरघोस उत्पन्न
अखेर स्वतः महाबळेश्वर येथे जाऊन आणली रोपे
अखेर नितीनने थेट महाबळेश्वर येथे जाऊन स्वतःच रोप खरेदी करून आणली. ही रोपे त्याला 13 रुपये प्रतिरोपाप्रमाणे सोळा हजार रुपयांना पडली आणि आपल्या दीड गुंठ्यात दीड बाय दीड अंतराने बेडवर त्या रोपांची लागवड केली. कृषी सहायकास योग्य मात्रा देण्यासाठी विचारणा केली असता आम्हाला या पिकासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे सांगून त्यांनी हात वर केल्याचे नितीनने सांगितले. शेवटी युट्यूबचा आधार घेऊन खताच्या मात्रा, फवारणीची माहिती घेतली. अन् तो स्वतःच प्रयोग करत राहिला. दीड महिन्यानंतर फळ धारणा झाली. अन् तोडही सुरू झाली.
400 ते 500 रुपये प्रति किलो मिळतोय भाव 'महाबळेश्वरमध्ये लावण्यात येणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या तुलनेत येथे स्ट्रॉबेरी लावगडीचे नियोजन चुकलेले आहे. तेवढे बारकाईने नियोजन आपण करूच शकत नाही. तरीदेखील प्रयत्न केलेले आहेत. मात्र, थोडेफार चुकले आहे. तरी, या स्ट्रॉबेरी या पिकाची योग्य वाढ होऊन फळधारणा देखील चांगल्या प्रकारे होत आहे. जवळपास दर दुसऱ्या दिवशी फळ तोडणीयोग्य होते आहे आणि चार ते पाच किलो स्ट्रॉबेरी निघत आहेत. त्याला 400 ते 500 रुपये प्रति किलो भाव जागेवरच मिळत आहे. उत्पादन कमी असल्याने मागण जास्त आहे,' असे युवा शेतकरी नितीनने सांगितले. त्यामुळे ग्राहकांना एक ते दोन दिवसाआड स्ट्रॉबेरी पोहोचवण्याची व्यवस्था तो करतो आहे.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे हिंगोलीत उत्पादन नोकरीच्या मागे न लागता शेतीत करा नवनवीन प्रयोग 'शिक्षण घेत असताना अन् ते पूर्ण झाल्यावर आपल्याला ओढ असते, ती नोकरीची. मात्र, अनेकदा पायपीट करूनही नोकरी लागलीच नाही तर अजिबात खचून जाऊ नये. नोकरीतून महिन्याकाठी पगारातून उत्पन्न मिळवता येते. मात्र, तेवढा पगार कमवण्यासाठी कष्टही असतात आणि बोलणेही खावे लागते. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या शेतीत जर थोडे डोके लावून वेगवेगळ्या प्रकारचे पीक प्रयोग केले तर, लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते,' असे नितीनचे म्हणणे आहे. असा प्रयोग आपण यशस्वी करू शकलो, याचे समाधान असल्याचे आणि वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाल्याचेही त्याने सांगितले.
हेही वाचा -सेंद्रीय शेती करण्यासाठी सोडला आयटीतला जॉब, आता महिन्याला कमावतेय ३ लाख रुपये