हिंगोली - कोरोनाचे भय हे अजूनही कमी झालेले नाही. त्या वार्डाकडे जाण्याची कुणाची हिम्मत होत नाही तर आत कुठं जाणार... मात्र, जेव्हापासून कोरोनाची लाट येण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून ही सफाई कामगार महिला या वार्डात दिवस-रात्र राबून, कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देतेय. त्यांना जेवू घालण्यापासून ते त्यांचे ताट धुण्याचेही काम या महिलेने केले आहे. अगदी एका हाकेवर ही महिला रुग्णाजवळ धावून येत, कर्तव्य बजावतेय. त्यामुळे ही महिला डॉक्टर, परिचारिका सोबतच कोरोना काळात रुग्णांसाठी संजीवनीच ठरली आहे.
इंदुबाई पांडुरंग भिसे असे या महिलेचे नाव असून, त्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या पाच वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. कोरोना महामारी आली अन् सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. मग कोरोनाला हरवण्यासाठी लढाई सुरू झाली. यामध्ये, अतिमहत्वाची भूमिका निभावली असेल तर, ती डॉक्टर, परिचारिका अन् त्यापाठोपाठ सफाई कर्मचाऱ्यांनी. सफाई करणारेही डॉक्टर, परिचरिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आजही दिवस-रात्र राबून कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्याचे काम केले जात आहे.
कोरोना वॉर्डमध्ये सफाईचे काम करतानाच ही महिला कोरोना बाधित रुग्णांना जेवण दिल्यानंतर त्यांचे ताट धुवून टाकण्यापासून ते त्या रुग्णांची आसन व्यवस्थाही व्यवस्थित करण्याचे काम करत आहे. आजही त्या त्याच ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कामामुळे ती एकट्या कोरोना वॉर्डमध्येच नव्हे तर, संपूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसिद्ध झाल्या आहेत. वार्डातील रुग्णांना, इंजेक्शन गोळ्या अन् सलाईन देण्याव्यतिरिक्त कोणतेही काम सांगा, अगदी सहजपणे काम करणाऱ्या म्हणून इंदुबाईंची ओळख आहे.
भीती तर होतीच; मात्र घाबरून चालणार तरी कसे?