हिंगोली - आजपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रांवरून १७ हजार ४४५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपी व इतर गैरप्रकार थांबविण्यासाठी तीन सदस्यीय बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हिंगोलीत ५३ परीक्षा केंद्रांवरून १७ हजार ४४५ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
हिंगोली जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रांवरून १७ हजार ४४५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपी व इतर गैरप्रकार थांबविण्यासाठी तीन सदस्यीय बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्षांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आदेश दिले आहेत. त्याचबरोबर परीक्षेसाठी ९१६ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पाच भरारी पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डायटच्या प्राचार्य, महिला विशेष भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी यांचा या भरारी पथकात समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर विभागीय मंडळ औरंगाबाद यांचे गोपनीय पथक तळ ठोकून लक्ष ठेवणार आहे.