हिंगोली -मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेत परिवहन विभागाने एसटीचा संप मोडीत काढून हिंगोली येथील आगारातून 8 बसेस सुरू केल्या आहेत. बस सुरू करताना हिंगोली व परभणी आगार विभागाचे नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी बसचे स्टेअरिंग अधिकाऱ्याच्या हातात देत आठ बस पोलीस बंदोबस्तमध्ये आगारातून बाहेर काढले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा लालपरी रस्त्यावर धावली आहे. यामुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी बंद पुकारलेला आहे. अचानक आज (गुरुवारी) हिंगोलीतील आगारातून 8 बसेस सोडण्यात आले आहेत. यामध्ये नविन चालकांना बसची स्टेरिंग दिल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हे आगार प्रवाशांच्या जीवावर उठल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. तरीदेखील आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बंद कायम पाळणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.