हिंगोली- राज्य राखीव दलाच्या कॅम्पमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा वरिष्ठांकडून त्रास वाढतच चालला आहे. दोन दिवसांपूर्वी याच कारणातून एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर आज पुन्हा एका जवानाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विलास भाऊसाहेब गायकवाड असे जवानाचे नाव आहे. या जवानावर हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंगोलीत वरिष्ठांच्या भीतीपोटी राज्य राखीव दलाच्या जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न - विष
हिंगोली येथील राज्य राखीव दलातील कॅम्पमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या जवानाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी याच कारणातून एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
जवान विलास हा मागील अनेक दिवसांपासून विना परवानगी सुट्टीवर होता. तो आज कर्तव्यावर हजर होणार होता. मात्र वरिष्ठ कोणताही निर्णय घेतील, या भीतीपोटी या जवानाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरूनच हिंगोली येथील राज्य राखीव दलातील कॅम्पमध्ये कर्तव्य बजावत असलेले जवान, हे किती मानसिक तणावाखाली आहेत. हे दिसून येते. दोन दिवसांपूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव येथील जवानाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप, त्याच्या नातेवाईकांनी केला. तर आता या जवानानेही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेले आहे. या प्रकाराने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली येथे उपचार घेत असलेल्या जवानाला बघण्यासाठी एसआरपीएफ जवानांनी एकच गर्दी केली.
या घटनेतील खरे कारण समोर आल्यानंतरच जवानांना दिली जात असलेली वागणूक समजणार आहे. हा डिपार्टमेंटला बदनाम करण्याचा तर प्रयत्न नाही ना, असाही प्रश्न उभा राहत आहे. विरिष्ठांकडून चौकशी झाल्यानंतर खरी परिस्थिती समजणार आहे. मात्र एका जवानाने आत्महत्या केली, अन दुसरा पण आत्महत्येचा प्रयत्न करतो. यामुळे हिंगोली येथील एसआरपीएफ कॅम्प महाराष्ट्रात चांगलाच चर्चेला आला आहे.