हिंगोली -5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
गुरुपौर्णिमा विशेष : 'वडील हेच माझे गुरू' - रुचेश जयवंशी हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी -
जीवन जगत असताना प्रत्येकाला गुरू भेटतच असतो, कारण गुरूशिवाय जीवन जगणे हे खरोखरच निरर्थक आहे. गुरूने दिलेली शिकवण आपण जर नेहमीच आचरणात आणत गेलो तर खरोखरच आपण आपले तर भले करू शकतो शिवाय दुसऱ्याचे ही आपल्यापासून भले होते. गुरुची शिकवण ही आयुष्यामध्ये कधीही ही वाया जात नाही, हे खरे आहे. प्रत्येकाला आयुष्यात गुरू भेटतो. माझ्यासाठी माझे गुरू माझे वडील आहेत, अशी भावना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केली आहे.
जीवनामध्ये गुरुची महती सांगताना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी संत कबीरांचा एक प्रसिद्ध दोहा उत्कृष्ट केला.
ते म्हणाले, 'गुरू गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहरी गुरू आपने गोविंड दियो बताय', 'यह विष की बेल री, गुरू अमृत की खान', या दोहाचा अर्थ म्हणजे एका शिष्याला चांगलेच कोडे पडले होते. गुरू आणि भगवान दोघेजण सोबतच उभे होते. त्यापैकी त्या शिष्याला तू गुरूच्या पाया पड, असे म्हटले गेले. त्यामुळे त्या शिष्याला नेमके कोणाच्या पाया पडावे, हेच कळत नव्हते. देवाने पाया पडायला सांगितले हा तर त्यांचा मोठेपणा आहे, याप्रकारे जीवनात गुरुचे महत्व आहे.
जीवनात देवाला कोणी पाहिले. मात्र, गुरुला प्रत्येक जण पाहतात. त्यामुळे गुरुचे जीवनातील महत्त्व हे अजिबात कमी नाही. गुरुने सांगितलेल्या मार्गानुसार जर आपण जीवनामध्ये वागत गेलो तर निश्चितच यश प्राप्त होते. गुरु हे शिष्याला कधीच चुकीचा मार्ग सांगत नसतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असतो तसे माझ्या जीवनात माझे वडील हे माझ्यासाठी गुरु आहेत. मी दहावीला असताना मला परीक्षेमध्ये मार्क कमी पडले होते. मात्र, माझ्या वडिलांनी अजिबात न रागावता मला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी तेव्हा स्वतःचा अनुभव सांगितला. त्यामुळे मी अजिबात खचून गेलो नाही. मात्र, दहावीचा निकाल लागल्यानंतर दिलेल्या दिलासा दिला. म्हणून मी चांगल्याप्रकारे शिकत गेलो. यामुळे बारावीमध्ये मला चांगले मार्क्स मिळाले. यानंतर असे यश मी कायम टिकवत राहिलो.
पुढे नोकरी लागल्यानंतरही माझ्या जीवनातील माझे गुरुसमान वडील यांचे स्थान हे कायम राहिले आहे. आयुष्यात तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधीच विसरू नका. त्यांच्यासाठी तुम्ही जे काही कराल ते कमीच आहे. त्यांनी तुम्हाला लहानपणापासून वळण लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो प्रयत्न अंमलात आणून तुम्ही मोठे झाले आहात. त्यामुळे आपल्या जीवनातील आई वडिलांचे महत्त्व हे आपण शब्दात नाही सांगू शकत नाही. जीवनामध्ये आई-वडील हे पहिले गुरू असतात, हे यामुळेच खरे आहे. त्यामुळे आपण आपल्या आई-वडिलांना अजिबात विसरू नये, अशा शब्दांत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या.