हिंगोली- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्स पाळावे असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक याचे पालन करताना दिसत नाहीत. हिंगोली येथे एक कोरोना रुग्ण आढळला आहे. तेव्हा पासून मोठ्याप्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. सोशल डिस्टिंग पाळावे म्हणून नगर पालिकेने भाजीपाला बाजार मोकळ्या मैदानात हलवला आहे. मात्र, नागरिकांकडून सोशल डिस्टन्सची पायमल्ली केली जात आहे.
हिंगोलीत सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली ... हेही वाचा-मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे
हिंगोली शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. नागरिकांना बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांसाठी चार दिवस आड शहरातील विविध भागात भाजीपाला बाजार भरविण्यात येत आहे. पूर्वी हाच बाजार आठ ठिकाणी भरविला जायचा. मात्र, मेहराजुलूम, रिसला बाजार, चिमणी बाजार या ठिकणी जागा अपुरी असल्याने, बाजारात गर्दी होत होती. त्यामुळे तेथील बाजार रद्द करुन, पालिकेने ताब्यात घेतलेल्या शहरातील पाच मैदानावर बाजार भरविला.
त्यामध्ये भाजीपाला विक्रेत्यांसाठी, ग्राहकांसाठी जागाही आखून देण्यात आली. प्रत्येक दुकानासमोर गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना उभे राहण्यासाठी पाच-पाच गोल रिंगण बनविण्यात आले होते. मात्र, रेल्वे स्थानक परिसरात भरविलेल्या भाजीपाला बाजारात ग्राहकांना गोल रिंगणाचा विसर पडल्याचे दिसून आले.
ग्राहकांना सोशल डिस्टन्सचे भान राहिले नाही. भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. ह्या प्रकारची माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांना कळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व भाजीपाला बाजाराची पाहणी केली. सोशल डिस्टन्सचे नियम मोडणाऱ्या दुकानदारांना कडक सूचना दिल्या. शिवाय, पोलीस प्रशासनातर्फे वाहने ताब्यात घेण्याचीही कारवाई करण्यात येत होती. एकंदरीतच या परिस्थिती वरुन नागरिकात कोरोना संदर्भात अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून आले.