हिंगोली -गेल्या पाच सहा वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, परतीच्या पावसामुळे तेरा वर्षांत पहिल्यांदाच सिद्धेश्वर धरण भरले आहे. हे धरण भरल्यामुळे हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.
हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण तेरा वर्षात पहिल्यांदाच भरले हेही वाचा - धुळ्यात पुलावरून पिकअप खाली पडली; 7 जणांचा मृत्यू, 25 जखमी
या धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तिनही जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात दर वर्षी कमाी पर्जन्यमानामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या असते. मात्र, यावर्षी पूर्णा नदीवर उभारलेले येलदरी आणि खडकपूर्णा धरण परतीच्या पावसाने शंभर टक्के भरले आहे. याच धरण साखळीतील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण देखील शंभर टक्के भरले आहे.
यंदा खरीप हंगाम हातचा निघून गेल्यामुळे या हंगामातील उणीव भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात याची मदत होणार आहे. हरभरा, गहू यासह रब्बीच्या इतर पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. सिद्धेश्वर धरण ते सिद्धेश्वर गावापर्यंत असलेला सांडवा हा दुथडी भरून वाहत असल्याने सांडव्याला धबधब्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या भागात मागील काही दिवसांपासून पर्यटकांची गर्दी होत आहे. सोबतच परिसरातील नदी नाले हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे या भागातील ग्रामस्थांना गाव गाठण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागत आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या नदी, नाल्यांमुळे परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - हीच ती वेळ ; महाविकासआघाडीला आज पेलवावे लागणार बहुमताचे 'शिवधनुष्य'
औंढा नागनाथ वसमत तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे याच धरणाचे पाणी हे नांदेड जिल्ह्यालाही जात असल्याने या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. जवळपास २०१२ पासून अपुऱ्या पाण्यामुळे हे धरण भरलेच नव्हते. मात्र, यंदा परतीच्या पावसाने या धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जवळपास दोन वर्षे तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरण परिसरातील गावात बोरवेल तसेच विहिरींची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनाही यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक उत्पन्न देणारा ठरणार आहे.