हिंगोली - जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाची दिवाळीच्या मुहूर्तावर वेगवेगळे अलंकार घालून लक्ष्मी पूजनानिमित्त पूजा करण्यात आली. ही परंपरा येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून वर्षातून दोन वेळा अशी अलंकार घालून पूजा केली जाते.
बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाची संपुर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. नागनाथाच्या दर्शनासाठी परराज्यातून भाविक हजेरी लावतात. येथील मंदिरावर करण्यात आलेले कोरीव काम हे भाविकांच्या नजरा खिळून घेते. त्यामुळे याठिकाणी एकदा दर्शनासाठी आलेला भाविक दुऱ्यांदा आवर्जून हजेरी लावल्याशिवाय राहत नाही. त्यातच नागनाथाची नागपंचमीला अन् दिवाळीला अलंकार घालून करण्यात आलेली पुजा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. यावर्षीही दीपावली सणानिमित्त नागनाथाची मूर्ती पूर्णपणे आलंकाराने सजवण्यात आली आहे. यामध्ये सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, कानातले, सेवनपिस, सोन्याची पिपळपान, मोत्याचा हार असे वेगवेगळे सोन्याचे अलंकार नागनाथाच्या मूर्तीला घालण्यात आले.