हिंगोली - येथील आगारात चांगल्या कमी आणि भंगार बसेसचा सर्वाधिक भरणा आहे. या भंगारात शिवशाही बसचाही समावेश असल्याचा अनुभव हिंगोली ते नांदेड मार्गे प्रवासादरम्यान प्रवाशांना आला आहे. चक्क टेस्टिंगच्या नावाखाली नांदेडला पाठवलेल्या शिवशाही बसने पीकअप घेतला नाही. तसेच मुख्य म्हणजे नांदेडला पोहोचण्याआधीच भोकर फाट्यावर तिने दम तोडला. हा प्रकार आज (मंगळवारी) घडला. या घटनेमुळे सरकारी प्रशासनाचा 'दे धक्का' या कारभाराचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
एम. एच.06 बी. डब्ल्यू 1004 क्रमांकाची शिवशाही बस हिंगोली येथून प्रवाशी घेऊन सकाळी 9 वाजता नांदेड मार्गे निघाली होती. शहरातून बाहेर निघाल्यानंतरही बसची गती वाढली नाही. ज्या स्थानकावर जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा कालावधी लागत होता तेथे 25 ते 30 मिनिटांचा कालावधी लागला. यानंतर प्रवासात अखेर ही बस भोखर फाट्याजवळ बंदच पडली. त्यामुळे प्रवाशांचा खूपच गोंधळ उडाला. बसमध्ये दवाखान्याच्या कामानिमित्त तसेच, कार्यालयीन कामासाठी ही प्रवाशी बसलेले होते. त्यामुळे झालेल्या या सर्व प्रकारामुळे बसमधील प्रवासी संतापले होते. दरम्यान, अनेकांनी चालकाला बस जोराने चालवण्यासाठी विनवणीदेखील केली.