महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत दुसऱ्यांदा सात दिवसांचा कडक लॉकडाऊन; लग्न सोहळे अन् राजकीय मेळावे बंदच

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिंगोलीमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावले. असे असतानाही रूग्ण आढळत आहेत, त्यामुळे आता पुन्हा सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Hingoli Lockdown
हिंगोली लॉकडाऊन

By

Published : Mar 28, 2021, 7:42 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 29 मार्च ते 4 एप्रिल या सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. लग्न सोहळे आणि राजकीय मेळाव्यांना पूर्णपणे बंदी घातली आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. याशिवाय शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका फक्त शासकीय कामासाठी सुरू असतील.

जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, प्रशासनाच्यावतीने दूध विक्री केंद्र आणि विक्रेत्यांना सकाळी 7 ते 10 या वेळात व्यवसायाला परवानगी दिली आहे. सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका कामकाजासाठी सुरू राहणार आहेत. यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवास करताना ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. या कालावधीत धार्मिक व प्रार्थना स्थळे, सर्व शाळा, महाविद्यालये सर्व मंगलकार्यालये, लॉन्स बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

मजूरांची होणार पुन्हा दैना -

नागरिकांना लॉकडाऊनची पूर्णपणे सवय झाली आहे. तरी मजुरांचे हाल होत आहेत. दिवसभराच्या मजुरीवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये कामकाज बंद असल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

फक्त कोर्ट मॅरेजला आहे परवानगी -

हिंगोलीमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एका दिवशी 100 पेक्षा जास्त रूग्ण सापडल्याने प्रशासकीय यंत्रणा पुन्हा गतीने कामाला लागली आहे. जिल्ह्यात 29 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. या काळात लग्न सोहळे व राजकीय मेळावे याला पूर्णतः बंदी घातली आहे. मात्र, कोर्ट मॅरेज करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details