हिंगोली - सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे गाव विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मागील 4 ते 5 दिवसांपासून विक्रीस काढले आहे. मात्र, गाव खरेदी करण्यासाठी कोणीच दाखल न झाल्याने आज शेतकऱ्यांनी या गावात मुंडण आंदोलन केले.
गाव विकणे आहे : 5 दिवस उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचे मुंडण आंदोलन - दुर्लक्ष
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे गाव विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मागील 4 ते 5 दिवसांपासून विक्रीस काढले आहे.
ताकतोडा या गावातील शेतकऱ्यांनी आपलेच गाव विक्रीसाठी काढून संपूर्ण महाराष्ट्रभर धूम पेटवली आहे. एवढे होऊन देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच पेचात पडले आहेत. बँका पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने, गावातील शेतकऱ्यांनी खासगी कर्ज घेऊन आपली गरज भागवली. मात्र, निसर्ग कोपल्यामुळे डोक्यावरील कर्ज कमी करणे शक्य झाले नाही. त्यातच सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज माफी योजना काढली त्याचा देखील या गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळेच हैराण होऊन येथील शेतकऱ्यांनी गाव विक्रीस काढून सरकारचे विविध मागणीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, 5 दिवस उलटले तरीही सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे गाव विक्रीस काढलेले शेतकरी नेहमी वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आज येथील शेतकरी व युवकांनी मुंडण आंदोलन केले. ताकतोडा येथील गावकऱ्यांचे हे आगळे-वेगळे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. एवढे करुन देखील सरकार लक्ष घालत नसेल, तर अजूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.