हिंगोली- यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झालेले आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागात तीन ते चार किमी पायपीट करावी लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्या शेतकऱ्यांना यावर्षीची 30 एप्रिलपर्यंतची देयके देण्याची सूचना पालक सचिव नितीन गद्रे यांनी प्रशासनाला दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अधिग्रहणाची संख्या 353 वर जाऊन पोहोचली आहे. तर टँकर 50 च्यावर सुरू आहेत. अजून टँकर अन् अधिग्रहण प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे जूनपर्यंत दोन्हीही संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर आलेले पालक सचिव गद्रे यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील पाणीटंचाईचा आढावा घेतला. ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या पाण्यासंदर्भात अडीअडचणी जाणून घेतल्या. टँकर वेळेवर येतो किंवा नाही, टँकरमध्ये ब्लिचिंग पावडर असते, की नाही, याची शहानिशा त्यांनी ग्रामस्थांकडून केली. एवढेच नव्हे, तर गद्रे यांनी अधिग्रहण केलेल्या विहिरीवर धाव घेत पाणी पातळीचा आढावा घेतला. इतर जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी बोगस अधिग्रहण तसेच अधिग्रहण केलेल्या विहिरींची पाणीपातळी पूर्णता खालावल्याचे धक्कादायक चित्र समोर आलेले आहे. हा प्रकार हिंगोलीत तर होत नसेल ना, याची पालक सचिव गद्रे यांनी बारकाईने तपासणी केली. विशेष म्हणजे रामवाडी येथे पाणी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत मोठ्या पोटतिडकीने सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे गद्रे यांनी कौतुक केले.