हिंगोली - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी हिंगोली लोकसभा मतदार संघात १ हजार ९९७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदान पेट्यांसह निवडणूक अधिकारी-कर्मचारी रवाना झाले आहेत.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी ९ हजार ८८९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर ९०१ कर्मचारी अतिरिक्त आहेत. नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाच्या वतीने शेवटचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे मतदान पेट्या स्वाधीन केल्या आहेत. तर मतदान प्रक्रियेसाठी एसटी महामंडळासह खाजगी, अशा एकूण ५०० वाहनांची निवडणूक विभागाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. आज मतदान पेट्या घेऊन निवडणूक कर्मचारी हे मतदान केंद्रावर रवाना झालेले आहेत. एका मतदान केंद्रावर ४ ते ५ कर्मचारी आणि ३ ते ४ पोलीस कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक कर्मचारी मतपेट्या घेऊन जात असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६ मतदार केंद्र संवेदनशील आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात १७ लाख ३२ हजार ५३४ एवढी मतदार संख्या आहे. तर ५ हजार ६९२ दिव्यांग मतदार संख्या आहे. हदगाव, किनवट, उमरखेड, हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या ६ विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
निवडणूक मतदान केंद्रावर जाणाऱ्या वाहनांवर दर्शनीय भागात गावांची नावे आणि मार्ग लावण्यात आले आहेत. या मार्गानुसारच कर्मचाऱ्यांच्या बसेस मार्गस्थ झालेल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने निवडणूक काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. शिवाय या भागात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
हिंगोली लोकसभेसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे आघाडी, महायुती अन् वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा नांदेड जिल्ह्यातील असल्याने आता मतदार कोणाला सर्वाधिक पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.