हिंगोली - दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज (सोमवारी) शाळा उघडल्या. पहिलाच दिवस असल्याने, हजारो विद्यार्थ्यांची पावले शालेय परिसरात पडल्यामुळे परिसर चांगलाच दणाणून गेला होता. आपल्या पाल्ल्यांना मोठ्या आनंदात पालक वर्ग शाळेत घेऊन येत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. तर शाळेच्या वतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फुल, पुस्तके व खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना घोड्यावर बसवून शाळेत आणताना शिक्षकवर्ग. यावेळी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी जिल्ह्यातील बऱ्याच शाळेला भेटी देऊन पाहणी केली. दोन महिने घरी सुरू असलेला किलबिलाट आता शाळेत होणार आहे.
सोमवार पासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. या वर्षीही शिक्षण विभागाच्या वतीने पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके पोहोचविले किंवा नाही याची पाहणी स्वतः शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी शाळेला भेटी देऊन केली.
विशेष म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये बच्चे कंपनीचा किलबिलाट वाढलेला असला तरी यावर्षी शिक्षण विभाग पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश पोहोचवू शकले नाही. आता गणवेशाची पद्धत बदलली असल्याचे शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी सांगितले. आता गणवेशाची रक्कम ही शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर टाकली जाणार आहे. ते गणवेश उपलब्ध करून देणार आहेत. या प्रकियेला अजून तरी आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षीही आठ दिवस जुन्या गणवेशावर विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने खास उपक्रम राबविले. पहिल्याच दिवशी शाळेत राबविण्यात येत असलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने मात्र चिमुकले भारावून गेले होते.
हिंगोली जिल्ह्यासह शहरात हजारोच्या संख्येने असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी रिक्षावाला काका, पालकांची शाळेच्या वेळेत पोहोचण्यासाठी एकच धावपळ पाहावयास मिळाली. तसेच बच्चेकंपनी सह शिक्षकांचीही वेळतच शाळेवर पोहोचण्यासाठी धावपळ वाढली होती.