हिंगोली - सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे एका युवकाने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पत्रकार मनीष खरात यांनी हा प्रकार फेसबुकवर पाहताच पोलिसांना याबाबत माहिती कळवली आणि युवकाशी संवाद साधत त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ सुत्रे हलवत, संबधित परिसरातील पोलीस पथक आणि नागरिकांना घटनास्थळी पाठवत युवकाला आत्महत्या करण्यापासून थांबवले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचे प्राण वाचले असून पोलीस खरोखरच जनतेसाठी 24 तास सेवेत असल्याचे दिसून आले.
संतोष वाठोरे (30), असे त्या युवकाचे नाव आहे. संतोष मागील दोन-तीन दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्याने आज सकाळी फेसबुकवर 'सॉरी मित्रांनो, आता सर्व काही संपलं, असा मेसेज टाकला. फेसबुक लाईव्हमध्ये तो रडताना दिसत होता. दरम्यान, त्याचा फेसबुक मित्र असलेल्या मनीष खरात यांनी फेसबुक लिंकवरून सदरील मित्राला बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो 'काही नाही हो सर, आता सर्व काही जे आहे, ते फेसबुक लाईव्हमध्ये थोड्यावेळात बघा' असे तो म्हणाला.