हिंगोली- आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने नरसी नामदेव येथील भूमीत भाविकांनी संत नामदेवांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. संत नामदेवाचे दर्शन म्हणजेच विठुरायाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार होतो, असे भाविक सांगतात. जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, ते वारकरी संत नामदेवांच्या पावन भूमीत येऊन दर्शन घेतात.
वारी विशेष : संत नामदेवांचे दर्शन म्हणजेच विठुरायाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार, भक्तांची भावना महाराष्ट्रातील प्रतिपंढरपूर असलेल्या नरसी येथील संत नामदेवांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली. विशेष म्हणजे भाविक मंदिर परिसरात गुरुवारपासून दाखल झालेले आहेत. भाविकांच्या गर्दीने नरसी नामदेव मंदिर परिसर पूर्णत: दुमदुमूला आहे. नामदेवांच्या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला नामदेवांचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने परिसरात दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा केल्या आहेत. शासकीय पूजेनंतर दर्शनाला सुरुवात झाली आहे.
आज मंदिर परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानकडून स्वयंसेवकांची करण्यात आली आहे. येथे पाच पोलीस अधिकारी, ७० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
तर औंढा नागनाथ येथील गोकर्ण मंदिर परिसरातही आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. त्यांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे. शिवाय या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे आणि संत नामदेवांचे मंदिर आहे. या मंदिरात पहाटे साडे पाच वाजता महापूजा झाली आणि त्यांनतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.