हिंगोली - जिल्ह्यातील नामदेव संस्थान, जिर्णोद्धार समितीने पुढाकार घेतला आहे. संस्थानच्या वतीने जिल्ह्यातील आठ ट्रॅक्टरच्या सहाय्याने अनेक गावांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. मंगळवारी मालसेलू येथे निर्जंतुकीकरण करण्यात आले. आतापर्यंत 150 गावात निर्जंतुकीकरण केल्याची माहिती संस्थानच्या वतीने जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी दिली.
जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने, लॉकडाऊन पाळण्यात आले आहे. पोलीस प्रशासनही आपली सेवा बजावत आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत. संत नामदेव महाराज संस्थान आणि जीर्णोद्धार समितीच्या वतीनेही कोरोनाचा सामना करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.