हिंगोली - दिवसाढवळ्या वसमत येथे गॅस एजन्सीच्या कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून कॅशियरच्या हातातील पैशाची पिशवी पळवली. ही घटना गुरूवारी (5 ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तरीही सुनियोजित पद्धतीने पैसे लुटण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर लुटारूंनी दाखवलेली बंदूक ही खरोखरची होती की खोटी होती, हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. मात्र, अशा थरकाप उडवणाऱ्या घटना वसमत शहराला नव्या नाहीत. घटनेत चोरट्यांनी 87 हजार रूपयांची रोकड पळविली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
बंदुकीचा धाक दाखवून पैशांची पिशवी लंपास
गजानन दरंगे असे या कॅशियरचे नाव आहे. तो या एजन्सीमध्ये जमा झालेली रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी सकाळी 11 वाजता एजंशीच्या बाहेर निघाला होता. तोपर्यंत चोरटे एजन्सीपासून काही अंतरावर नजर ठेवून बसले होते. दोघेजण रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून दरंगेची बाहेर येण्याची प्रतीक्षा करत होते. दरंगे बाहेर पडताच दोघेजण दुचाकीवर आले. पाठीमागे बसलेल्या एकाने दरंगेवर पिस्टल रोखला. त्यामुळे दरंगेने हात वर केले. तेवढ्यात चोरट्यांनी हातातील रक्केची पिशवी हिसकावून पोबारा केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
जिल्ह्यात खळबळ
मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. पोलीसही चोरट्यांचा शोध घेत आहेत. त्यातच आता ही घटना घडल्याने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असले तरीही आता चोरट्यांना पोलीस केव्हा ताब्यात घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.