हिंगोली -जिल्ह्यात काही केल्या चोऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही असे दिसतेय. गुरुवारी वसमत येथे पिस्तुलचा धाक दाखवून रोख रक्कम पळविल्याची घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे एटीएम पळविल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. घटना स्थळापासून काही अंतरावर पाण्यात रिकामे एटीएम सापडले आहे. त्यातील संपूर्ण रक्कम चोरट्यांनी पळविली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. मात्र वारंवार धाडसी चोऱ्या करून एकाप्रकारे हिंगोली पोलिसांना चोरटे आव्हानच देत आहेत. या संपूर्ण प्रकाराने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गावापासून काही अंतरावर पाण्यात आढळले एटीएम -
शिरड शहापूर येथे बसस्थानक परिसरात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम राज्यमहामार्गावर असल्याने औरंगाबादकडून आंध्रप्रदेशात वाहने याच रस्त्याने जातात. तसेच, परिसरातील 30 ते 40 गावांचा देखील शिरड शहापूर या गावाशी संपर्क येतोय. त्यामुळे या एटीएमचा सर्वच ग्राहकांना चांगला फायदा होत होता. मात्र, आज पहाटे सहाच्या सुमारास गावापासून काही अंतरावर पाण्यात हे एटीएम फोडलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश कलासगर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील गोपीनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने धाव घेतली.
सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात -
पथकाने घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची तपासणी केली जात आहे. तर घटनास्थळावरून पाच किमी अंतरावर रिकामे एटीएम आढळून आले आहे. चोरट्याने एटीएम फोडून त्यातील रक्कम पूर्णपणे लंपास केली. पंरतु, एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती हे अजून तरी स्पष्ट झाले नाही. मात्र, या धाडसी चोऱ्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.