हिंगोली -औंढा नागनाथ येथील जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य मार्गावर रिपब्लिक सेनेच्या वतीने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी एक तास रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जिल्ह्यात खरिपाचा हंगाम सध्या बहरला आहे. मात्र, वन्य प्राणी उभे पिक फस्त करून अतोनात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राण्यांना हकण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर हे वन्य प्राणी हल्ले करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. अनेकदा वनविभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, काहीच दखल घेतली गेली नाही. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असलेला शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासाने हैराण झाला आहे. त्यातच टेकडी भागातील आणि माळ राणाकडची शेती प्राण्यानी फस्त केलेली आहे. उभे पिक फस्त झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांनी काढलेल्या गोफण मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.