हिंगोली- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. मात्र, विधानसभेच्या तोंडावर विविध पक्षांतून आउट गोईंग अन इन्कमिंग जोरदार सुरु आहे. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश करून तिकीटाची देखील मागणी केली आहे. त्यामुळे हिंगोलीतील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगत आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघात वंचितला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने, राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारमध्ये सत्तेत असलेले अनेक नेते व कार्यकर्ते वंचितच्या वाटेवर आहेत. ही परिस्थिती केवळ हिंगोली मतदार संघाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच दिसत आहे. त्यामुळे वंचितकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक दिग्गज गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर आपणच निवडून येणार याचा दावा मुलाखतीतून करत आहेत. राष्ट्रवादीचे हिंगोली तालुकाध्यक्ष माधव कोरडे यांनी वंचितचे वारे पाहून थेट राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला आहे.