हिंगोली- जिल्ह्यात मागील १० ते १५ दिवसापासून पाऊस नसल्याने खरीप पिके कोमेजून जात आहेत. काही काही भागात तर जमिनीला भेगाही पडल्या आहेत. या भेगा पाहून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतकरी पाऊस पडावा म्हणून नाना प्रकारचे प्रयोग करीत आहेत. तर काही शेतकरी डोक्यावर किंवा टँकरचा आधार घेत पिके जगवण्यासाठी धडपड करत असल्याचे भयंकर चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. दरम्यान, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज कुठे सेनगाव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर्षी आतापर्यंतचा सर्वात जोरदार पाऊस झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील ३ ते ४ वर्षापासून अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. मृग नक्षत्र पूर्णतः कोरडेठाक गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. कसाबसा जिल्ह्यात पाऊस झाला त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली. मात्र, आजघडीला १० ते १२ दिवस उलटले तरीदेखील पावसाने हजेरी लावली नसल्याने खरिपाचे पीक पूर्णतः सुकून जात आहे. काही भागात तर पावसाअभावी जमिनीला भेगादेखील पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली.