हिंगोली - शहरात दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी संतोष भिसे यांच्यासह एका छायाचित्रकारावर पोलिसांनी 'लाठीचार्ज' केला आहे. या लाठीचार्जमध्ये संतोष भिसे यांच्यासह छायाचित्रकार देखील गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तर विविध संघटनांच्या वतीने लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.
हिंगोली येथे दोन जातींमध्ये दंगल झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. हिंगोली शहरात मस्तानशाहानगर भागातील इ 10 मैदान ते अग्रेशन चौक दरम्यान आज सकाळी कावड यात्रेवर हल्ला झाल्याच्या कारणावरून उसळलेल्या दंगलीत दहा ते पंधरा जण जखमी झाले. रस्त्यावरील सुमारे ३० वाहनांची तोडफोड समाजकंटकांनी केली. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी संतोष भिसे आणि 'फ्रीलान्स'चे छायाचित्रकार निलेश गरवारे यांच्यावर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी लाठीहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
दंगलीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांचा 'लाठीचार्ज'; 'ईटीव्ही'च्या प्रतिनिधीसह एकजण गंभीर जखमी - hingoli news
शहरात दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी संतोष भिसे यांच्यासह एका छायाचित्रकारावर पोलिसांनी 'लाठीचार्ज' केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
![दंगलीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांचा 'लाठीचार्ज'; 'ईटीव्ही'च्या प्रतिनिधीसह एकजण गंभीर जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4114917-thumbnail-3x2-malik.jpg)
कावड यात्रेवर दगडफेक झाल्याच्या कारणाने हिंगोली शहरात दोन समाजाच्या दंगलीवेळी समाजकंटकांनी दिसेल त्या वाहनाला लक्ष्य केले. त्याचबरोबर दगडफेक करून निष्पाप लोकांनाही गंभीर जखमी केले. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात ठिक-ठिकाणी लाठीचार्ज केला. त्यामुळे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास परिस्थिती सामान्य झाली. परंतु, त्यानंतर विविध ठिकाणच्या नुकसानीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले 'ईटीव्ही भारत' वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष भिसे यांना हिंगोलीतील तापडिया इस्टेट भागात वार्तांकन करीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला.
विशेष म्हणजे या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक काशीद हे कर्तव्य बजावत होते आणि पत्रकार भिसे यांनी त्यांना पोलिसांकडून होत असलेल्या मारहाणीबाबत कल्पना दिली, सोडवणूक करण्याची विनंतीसुद्धा केली, तरीसुद्धा पोलिसांनी मारहाण केली. तर अशीच घटना हिंगोली शहरातील एनटीसी भागात घडली. छायाचित्रकार निलेश गरवारे हे दगडफेकीमध्ये नुकसान झालेल्या भागाचे वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणीसुद्धा पोलीस उपनिरीक्षक काशीद यांनी हिरोगिरी करत गरवारे यांनासुद्धा बेदम मारहाण केली. यामध्ये गरवारे यांच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून या मारहाणीत त्यांचा 70 हजार रुपयांचा कॅमेरा सुद्धा फुटला आहे. दोन्ही जखमी पत्रकारांवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.