हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर तेच दुसरीकडे आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासन हतबल होताना दिसत आहे. एका खुनाच्या घटनेत आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनास जाहिरात करण्याची वेळ आली आहे. तसेच या आरोपीवर पोलीस प्रशासनाने 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.
मथुराबाई पांडुरंग कोरडे (वय - ६५, रा. तळणी) ही महिला 4 जानेवारीला सकाळी दहा ते अकरा वाजता शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. सायंकाळच्या सुमारास शेळ्या घरी परत आल्या. मात्र, मथुराबाई घरी परतआल्या नाहीत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता अज्ञाताने महिलेचा गळा दाबून खून केल्याचे आढळले. तसेच त्यांच्या अंगावरील सर्व दागिने लंपास केले गेले होते. याप्रकरणी महिलेचा मुलगा नागोराव कोरडे यांच्या फिर्यादीवरून नरसी पोलीस ठाण्यात 5 जानेवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.