हिंगोली-राज्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लावण्यात आली आहे. मास्क वापरा, रस्त्यावर फिरू नका, घरातच बसा असे प्रशासनाकडून, माध्यमांतून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, काही लोकांवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. विनाकारण मोकाट रस्त्यांवर काही जण फिरत आहेत. त्यामुळे हिंगोली पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवत चोप द्यायला सुरुवात केली आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा चोप... हेही वाचा-'कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाला, यास पुरावा नाही' - चीनी दुतावास
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर न येण्यासंदर्भात स्वतः देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस अधिकारी देखील हात जोडून विनंती करीत आहेत. मात्र, याचा काही नागरिकांवर परिणाम होत नसल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे अशांना पोलीशी खाक्याचीच भाषा समजते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊनच बाहेर यायचे असेही सांगण्यात आले. मात्र, नागरिक कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अशांना शर्ट काढून तोंडाला बांधायला लावला आहे. तर काहींना उठाबशा ही काढायला लावल्या आहेत.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे.